----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
द भालेराव---१५
हे भगवान !
अगदी सरळ स्वभाव, सर्वांशी हसतमुख, सगळे काम बिनबोभाट, आणि कधी कशाबद्दल पराकोटीचा राग नाही, असे सगळे सदगुण असतानाही काळाने मोटार अपघातात, नेमके भगवान धामणगावकरलाच उचलून न्यावे हे काही तरी गौड-बंगालच म्हणावे लागेल.
भगवान हे नाव आताशी कोणाचे ऐकू येत नाही. ते जरी असे जुन्या वळणाचे असले, तरी त्यातून भगवानाचेच निरनिराळे पैलू म्हणता येतील असे भाव त्याच्या वागण्या-बोलण्यातून दिसत असत. तो जेव्हा प्रथम मुंबईला माझ्याकडे आला होता, तेव्हा तर त्याची वाईट परिस्थितीची खडतर अशी परिक्षाच चाललेली होती. नोकरीचा शोध, पैशांची चणचण, आणि ओळखीचे कोणी नाही, असे चोहोबाजूने कोंडणारे दिवस होते. त्यात चार विरंगुळ्याचे क्षण तेव्हढेच काय ते मी देऊ शकलो असेन, पण त्याने ते क्षण कायमचे बोलून दाखवून मानाचे केले. तो येई तेव्हा योगायोगाने जेवणात भेंडीची भाजी असे, त्यावरून माझ्या मुलांनी त्याचे टोपण नावच भेंडी-भगवान असे केले होते. आता भेंडीची भाजी तशी होणे नाही. आताशा डॉक्टर गुरशानींच्या शाळेच्या कामाच्या व्यापात त्याचे वेगळेच धीर-गंभीर पण शांत रूप दिलासा देणारे होते. त्यातही सायबर-लॉची पदवी घेऊन त्यात काम करण्याची व शाळेत संगणकाचा ज्यास्तीत ज्यास्त उपयोग करण्याची त्याची अद्ययावत दृष्टी वाखाणण्यासारखी होती. म्हणूनच तर त्याला आवडेल असा हा ई-श्रद्धांजलीचा प्रयत्न आहे .
रूढ रीतीप्रमाणे पैसा-अडका, घरबार, गाडीघोडा, मानमरातब, हे सगळे त्याला माफक प्रमाणात मिळालेच होते. त्यासाठी त्याचे प्रचंड प्रयत्न करून झाले होते. पण ह्या पलीकडे महत्वाचे मानून त्याने माणसे जोडली, त्यांचा लोकसंग्रह प्रयत्नाने केला. आजकाल अनंत भालेराव प्रतिष्ठानचे कामही तो बर्याच उत्साहाने करताना दिसत होता. नातेवाईक व मित्रांशी नेहमीचा प्रेमळ सलोखा तर कायमचाच दिसणारा होता. सालसपणाचे तो एक आदर्श उदाहरणच होता इतके त्याचे व्यक्तिमत्व भावणारे होते.
त्याला जोडीदारीणही तशीच सरळ, मृदू स्वभावाची मिळाली होती. त्याच्या मुलाबरोबर तो लहान असताना मला चार पाच वेळा चांगलेच खेळायला मिळाले होते. आता त्याच मुलाचे लग्न ठरवून तो घरी परतत होता हे ऐकून किती मोठ्ठा काळ कसा पटकन लोटला त्याचे भान येते. माणसाचे क्षणभंगुर जगणे संपले तरी इतर जगाला रहाटीत फिरतच राहावे लागते. ह्या कालचक्राच्या फिरण्यात, त्याच्या पत्नीला आणि मुलांना त्याच्या पश्चात जीवन रेटण्याची शक्ती मिळो, उभारी येवो हीच प्रार्थना.
-------अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Thursday, March 10, 2011
Subscribe to:
Posts (Atom)