Tuesday, October 4, 2011

द भालेराव---१७
तब्येतीत हसणे !

आमच्या आईच्या दुखण्याचे एक मोठेच प्रकरण होते. ती होणार्‍या त्रासाचे नक्कीच इतरांना ऐकवी पण ते केवळ तुम्ही ऐका, एवढ्याच अपेक्षेने असायचे व त्यावर ती स्वत:ही हमेश: विनोदाने चेष्टा करायची. एकदा एका एम.डी.च्या विद्यार्थ्याला घेऊन ती मुंबईला आली होती. त्या विद्यार्थ्याच्या कोणी गाईड, सायन हॉस्पिटलच्या मेडिसिन विभागाच्या प्रमुख होत्या. त्याने माझ्या आईला त्यांना दाखवण्याचा घाट घातला होता. मीही बरोबर गेलो होतो. प्रमुख बाई पारशी होत्या. त्या टिपिकल पारशी मराठीत म्हणाल्या, हं सांगा हिस्ट्री ! त्यावर आमची आई म्हणाली कुठून सांगू ? त्या म्हणाल्या अगदी "पहिले पासनं". त्यावर आईनं विचारलं औषधांची हिस्ट्री सांगू का रोगांची. त्यावर त्या बाई हसल्या खर्‍या, पण आई घेत असलेली कित्येक औषधे इतिहासजमा झालेली होती हे ती हिस्ट्री सांगत असताना माझ्या ध्यानात आले.
असेच आमच्या वडिलांचे केईएम मध्ये थायमेक्टोमीचे ऑपरेशन झाले तेव्हा सगळ्यांचे लक्ष त्यांच्या तब्येतीकडेच असायचे व ते साहजिकच होते. पण आईला आपल्याच तब्येतीचे असलेले कौतुक स्वस्थ बसू देत नसे. एकदा सकाळी हॉस्पिटलला जाताना ती म्हणू लागली की खरं म्हणजे तिचीच तब्येत काळजीची आहे. वडिलांचे काय फक्त ऑपरेशनच तर आहे. पण तिची तब्येत किती बेभरवशाची . त्यावर मग मी म्हटलं की आज आपण जरा लवकर आलो आहोत तर समोरच्या हॉटेलात नाश्ता घेऊ व त्यावेळेस तू तुझ्या तब्येतीचे सवीस्तर सांग, मग तसे दाखवू. ह्यात स्वत:च्या तब्येतीचे कौतुक जितके होते तेव्हढेच एक खेळकरपणे त्या त्रासाचे झेलणे होते. नंतर वडिलांची तब्येत जरा काळजीची झाली तेव्हा सगळ्या डॉक्टरांसमोरही तिने हेच म्हटले की तिचीच तब्येत ज्यास्त काळजीची आहे, तेव्हा खोलीतले टेंशन तिच्या ह्या खेळकर तक्रारीने एकदम उतरले होते.
सगळ्या तपासण्या झाल्या की सगळेच डॉक्टर तिच्या क्रॉनिक डिसेंट्रीची "मानसिक" म्हणून बोळवण करीत. ती स्वत:ही जितके डिसेंट्रीचे लाड करायची तितकीच खेळकरपणे त्याचे टेंशन घालवण्यासाठी म्हणायची "आजचा स्कोअर दोन आकडी झालाय !" तिच्या तब्येतीच्या कौतुकाची परमावधी म्हणता येईल असा प्रसंग हैद्राबादी मी दुसरीत असताना झाला होता. हैद्राबादचे आरोग्यमंत्री असलेले डॉ.मेलकोटे आमच्या वडिलांच्या फार परिचयाचे होते. त्यांचे एक सॅनेटोरियम शहरातच होते. त्यांना तब्येत दाखवल्यावर त्यांनी आईला सॅनेटोरियममध्येच दाखल करून घेतले होते. इतके अलिशान सॅनेटोरियम होते की एक प्रशस्त बंगलाच आमच्या आईला देण्यात आला होता. नर्सेस, डॉक्टर सदैव तैनातीत असायचे. मी शाळा सुटली की सायकलने तिचा जेवणाचा डबा घेऊन यायचो. त्यावेळी मला सायकलच्या सीटवर बसता येत नसे. मी तेव्हा सायकल-कैंचीतच चालवायचो. सॅनेटोरियमच्या निवांतपणाचा मला असा फायदा झाला की तिथल्या प्रशस्त आवारात मी सीटवरनं सायकल चालवायला शिकलो. चांगले महिना दीड महिना आईने सॅनेटोरियमचा पाहुणचार घेतला होता. त्याच दरम्यान जवाहरलाल नेहरूंनी त्या सॅनेटोरियमला भेट दिली होती व मी त्यांना तिथलेच गुलाबाचे फूल दिले होते. डॉक्टर मेलकोटेंसारखेच जवाहरलालही एकदम लालबुंद गोरे होते. त्या दरम्यान ती दुखण्याचे कमी व सॅनेटोरियमचे कौतुक सगळ्यांना हटकून सांगायची.
एखाद्या व्याधीवर हसणे, त्याची चेष्टा करणे हा माणसाचा जणू स्वभावच होऊन जात असावा. आई स्वत:च्या त्रासाचे जितके कौतुक करायची किंवा करवून घ्यायची त्याहीपेक्षा त्याची चेष्टा उडवणे हे तिच्या अंगवळणीच पडले होते. शेवटी शेवटी तिला विस्मरणाचा त्रास होतोय असे अशोक सांगे. मी एकदा त्याला विचारले की म्हणजे काय म्हणते ती ? तर सांगायला लागला की तिच्या खोलीत कोणी नसले की जोराने ती हाका मारी. कोणी दाद नाही दिली तर मोठ्याने "अशोक अनंतराव भालेराव" अशी सबंध नावाने हाका मारी. त्यावर अशोकने तिला सांगायचा प्रयत्न केला, की असं बरं नाही, लोकं नावं ठेवतात. त्यावर तिनं विचारलं की कोण नावं ठेवतात. बापू काळदाते शेजारीच असतात. अशोकने त्यांचे नाव सांगताच आई म्हणाली म्हणे की अं, त्यांचं काय एवढं, आपणच तर त्यांना औरंगाबादला आणलंय, त्यांचं सगळं केलंय त्यावेळी ! अशोक हे तिच्या विस्मरणाचे म्हणून सांगत होता व ते मला तिच्या कणखरपणाचे, हसून टाळण्याचे वाटत होते.
प्रकाश चिटगोपीकराचेही असेच हसून निभावणे मोठे मजेशीर होते. त्याची जे.जे.त शस्त्रक्रिया झाल्यानंतर आम्ही त्याच्या विचारपूशीला गेलो तेव्हा त्याने छातीत येणार्‍या कळीचे जे बहारदार वर्णन केले होते, त्यावरून ते दुखणे की त्याची टर असेच कोणाला वाटावे. नागनाथराव परांजपे हे सुद्धा स्वत:ला फार जपत. थोडीही सर्दी झाली की डोक्याला टॉवेल वगैरे गुंडाळीत, पांघरूण घेत. व वर म्हणत की बाबा हे शरीर ह्या राष्ट्राची संपत्ती आहे ! दुखणे हे कौतुक करूनही न जाणारे झाले की माणूस मग त्याची हसूनच जिरवायचा प्रयत्न करतो तो असा ! ह्यात त्या दु:खाला सहानुभूती मिळवण्यापेक्षा त्यावर हसणेच हा माणसाचा स्वभाव होतो !
---------------------------------------------------------------------------