----------------------------------------
सतीश मुळे ह्याचा विनोदी स्वभाव !
-----------------------------------------
सगळे चांगले असले की माणसाला विनोद सुचतात, पण सतीश मुळे असा वेगळा होता की अडचणीतही त्याला विनोद सुचत व त्यावर आम्ही अनेक वेळा हसलो आहे. त्याने अकाली जाऊन मात्र आम्हाला अडचणीत आणले आहे.
हा अगदी लहान असताना, म्हणजे पाचसहा वर्षांचा असताना, बाबुराव मामा ( त्याचे वडील ) त्याला हैद्राबादी घेऊन आले होते. त्यावेळी त्याला पायात मोठे मोठे बूट घालावे लागत असत. पण त्यातही तो त्याचा खेळकरपणा टिकवून होता. पुढे मेडिकल करताना तर केवळ त्याच्या कुशाग्र बुद्धीमुळे व स्मरणशक्तीमुळे तो डॉक्टरकी पूर्ण करू शकला. त्याला वाचायला खूप त्रास होई, तेव्हा त्याचे मित्र खोलीवर येऊन त्याला वाचून दाखवत व तेव्हढ्यावर ह्याने सगळ्या परिक्षा यथोचित पार पाडल्या होत्या. हे त्याचे यश फारच कौतुकास्पद आहे.
त्याला सिनेमा नाटकांची फार चांगली अभिरुची होती व त्यामुळे कुठलाही नवा हिंदी सिनेमा आला की हा त्या सिनेमातल्या डॉयलॉग्जवर इतकी टिंगल करी की त्यामुळे आम्हालाही विनोदाची, विडंबनाची जाण यायला लागली होती.
त्याचे वडील आमच्याकडे आले की आम्हा लहान मुलांची चांगलीच परिक्षा घेत व त्यातून सहीसलामत सुटणे हे फार जिकीरीचे काम असे. पण बाबुराव मामांचा वारसा चालवत सतीशने सर्व कौटुंबिक, सामाजिक जबाबदार्या यशस्वीरित्या व हसतमुखाने पार पाडल्या आणि आज मामा असते तर त्यांना त्याचा रास्त अभिमान वाटला असता.
सतीशच्या कुटुंबियांना ह्या संकटातून पार पडण्यासाठी बळ मिळो हीच प्रार्थना व सतीशला अनेक प्रणाम !
------------------------------------------