काँग्रेसची पोरं लई हुशार !
हुशारी ही एखाद्या संस्थेकडे असतेच की हुशार माणसे त्या संस्थेत आल्याने त्या संस्था हुशार होतात हा संशोधनाचा विषय असावा. पण इतक्या वर्षांपासून काँग्रेस पक्ष सत्ता कब्जात ठेवून आहे की सत्तेला काय लागते व काय चालते हे ते चांगले जाणतात. कसे ते पहा.
शरद पवारांवर अगदी पोरासोरांनी ह्या एक दोन महिन्यात तोंडसुख घेतले. मागे पवार म्हणत की पाऊस पडला नाही तरी त्याला शरद पवारांना दोषी धरायचे , ह्या नीतीला धरून महागाईला तेच आणि तेच कसे जबाबदार आहेत ह्याचा सगळ्यांनी गळा काढला. काहींना वाटले आता साहेबांचे दिवस भरले, आता काही ते रहात नाहीत. साहेबांनीही निर्यातीचा निर्णय कसा माझा नव्हता, तुमचा होता, व त्याने साखर महागली वगैरे भाषा सुरू केली आणि काँग्रेसला भान आले. त्यांना साक्षात्कार झाला की आपल्याला कोणाचा दोष काढण्यापेक्षा सत्तेला सुरुंग लागणार नाही हे पाहणे महत्वाचे आहे.
मग त्यांनी काय केले, बजेट मध्ये पेट्रोल व डीझेलचा भाव वाढवला. ह्याने झाले काय की महागाई खरेच वाढली तर ती इंधन-भाववाढी मुळे वाढली असे झाले. पवारांचे कारण आता झाकले गेले. इंधन भाववाढ काय एकदोन वेळा करावीच लागते आणि ती सगळ्यांच्याच परिचयाची आहे. एक प्रकारे तिला जनतेची माफीच आहे. आणि आता बजेटच्या वेळी नड कशाची आहे तर जीडीपी ची घोडदौड दाखवायची. शिवाय जीडीपी चा काय आकडा काढायचा ते तर तद्दन आपल्या अखत्यारीतील बाब आहे. हा आकडा कसा काढतात, तो कसा लाख कोटीत आहे, हे कोणा लेकाला कळते ? कळलेच नाही तर त्याविरुद्ध बोलणार तरी कोण ? तर सत्ता अशी अबाधित !
पवारांना असं कव्हर केल्यावर ते कशाला काय बोलतील ?
काँग्रेसची पोरं अशी हुशार !
---अरूण अनंत भालेराव
Thursday, March 4, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment