Thursday, July 22, 2010

द भालेराव-७
"वारसा"चे तत्व
पूर्वी वारसा हक्काने सर्व मिळकत फक्त मोठया मुलाला मिळे. तर कित्येक घरात मोठ्या मुलाला अमुक तमुक देवाला किंवा देवीला वाहून टाकत असत. शिखांमध्ये मोठया मुलाला सरदार व्हावेच लागे. मुसलमानांमध्ये माणसाला आपल्या मिळकतीचा काही भागच ( १/३) मृत्युपत्राद्वारे देता येतो. उरलेल्या २/३ भागातून नातेवाईकांना वारसाहक्काने मालमत्ता वाटतात. त्यात मुलाला दुप्पट भाग मिळतो तर मुलींना एक भाग. २००६ पासून हिंदू मुलींना समान वाटा मिळावा असा कायदा झाला आहे.मृत्युपत्र केलेले नसेल तर मालमत्ता समान भागात वाटतात.
समान भागाचे हे वारसाचे तत्व कसे व का अमलात आले असावे ?
मृत्युपत्रा प्रमाणे वाटणे हे त्या माणसाच्या मताप्रमाणे असल्याने ते अर्थातच त्याच्या मनाप्रमाणे असते.पण त्याच्या पश्चात वाटण्यासाठी काय रास्त प्रमाण असावे ? आपल्याकडे मेरिट म्हणजे मार्क, परीक्षा, असेच समजले जाते.पण एखाद्याची मालमत्ता वाटण्यासाठी काही परीक्षा असत नाही.मग कोणाला किती मार्क्स मिळतील त्याचा काही संबंधच रहात नाही. गरीबी श्रीमंतीवरून वाटण्या केल्या व श्रीमंतालाच परत ज्यास्त वाटा दिला तर ते गरीब वारसाला अन्यायाचे वाटणार.गरीब वारसाला ज्यास्त वाटा दिला तर दुसर्‍यांना ते अन्यायाचे वाटणार. जसे मृत्युपत्रात त्या माणसाची इच्छा व्यक्त केलेली असते तसे त्याच्या मृत्यू पश्चात काय योग्य हे कसे ठरवायचे ?
प्रत्येक माणसाचा दृश्य हेतू पुढे त्याच्या संततीची प्रगती व्हावी असाच असतो. कोणाची किती प्रगती होऊ शकते ह्याचे काही आडाखे आपण बांधू शकत नाही. कोणी कवी मृत्यू पावला व त्याचा अंश पुढच्या पिढीत रहावा अशी योजना करू म्हटले तर त्याच्या मुलांत कोण चांगला कवी होऊ शकतो हे पहावे लागेल.पण प्रत्यक्षात अंदाजाप्रमाणे किंवा परीक्षेप्रमाणे कोणाची प्रगती होते हे बेभरवशाचे असते. शिवाय कवी असलेल्या माणसाची धन्यता त्याची मुलेही कवी झाल्याने होते की ते डॉक्टर , इंजिनियर झाल्याने होते हे कसे व कोण ठरवणार ? एका माणसाचा डिएनए पुढच्या पिढीत काय झाल्याने प्रगत डिएनए होईल ह्याला काही अदमास नाही. मग सर्वच पुढच्या पिढीच्या डिएनए ज ना सारखे हिस्से दिले तर त्या सर्वांना सारखे प्रोत्साहन दिल्यासारखे होईल. व मग त्यातूनच कोणा तरी वारसाचा डिएनए वाढीस लागेल व मृत्यू पावलेल्या डिएनए ला धन्य वाटेल. हेच असेल समान वारसा हक्काचे तत्व ?

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

No comments:

Post a Comment