द भालेराव---१४
केशवराव देशपांडे---मराठवाडयाचे साने गुरुजी !
दिलशाद टॉकीज हैदराबादची सुलतानबाजारातली गजबजलेल्या वस्तीतली टॉकीज. मॅनेजरच्या खोलीला त्याकाळातले प्रसिद्ध अर्धे स्प्रिंगचे दार. त्यात मला ( वय वर्षे १०) खालून केशवराव काका खुर्चीत बसलेले दिसले. मागून माझे काका लोक मला ढोसत होते की आत जा व चिठ्ठी दाखव. वडिलांनी चिठ्ठी दिलेली होती, "मुले सिनेमाला येत आहेत, कृपया त्यांना सोडावे !" सिनेमाला चिक्कार गर्दी. लोकांची मॅनेजरच्या खोलीत चांगलीच वर्दळ, मागाहून माझ्या काका मंडळींचे ढकलणे. मी कसाबसा आत जातो. काही न बोलता केशवराव काकांच्या हातात चिठ्ठी देतो. ते म्हणतात, "अरुण ना तू. थांब हा थोडं, किती जण आहात ? " मग बराच वेळ आम्ही बाहेर थांबतो. मधनं मधनं आतून कळत राहते की इंडियन न्यूज रिव्ह्यू सुरू झालाय, गर्दीची वर्दळ वाढतेय, आमची चलबिचल. तेव्हढ्यात केशवरावकाकांचे बोलावणे येते, एका माणसाबरोबर ते आम्हाला आत सोडतात. हुश्श ! सिनेमा सापडला ! खरे तर चिठ्ठीने फुकट सिनेमा पाहतोय ह्याचे आम्हालाच कानकोंडे वाटत असायचे पण केशवरावकाका सर्व परिस्थिती जाणून अतिशय मृदू हाताळणीने काहीही दडपण आमच्यावर येऊ द्यायचे नाहीत. दुसर्याचा इतका विचार करणारे लोक खरच विरळा !
त्यानंतर ते मराठवाड्यातच आले. पैशाचे सर्व व्यवहार त्यांच्याकडे असत. आमच्याकडे घरी पैशाची कायमच चणचण व आणिबाणीचे प्रसंग सारखे येत. मग वडिलांना हातउसने उचल घ्यावी लागे. कित्येकवेळा आमची आईसुद्धा केशवरावकाकांना शब्द टाकायची. सगळ्यांचीच ओढाताण असायची. त्यात केशवरावकाकांना खरे तर कडक होणे व पैसे नाकारणे काही जड गेले नसते. पण त्यांचा स्वभाव इतका मुलायम व संवेदनशील की ते पैसे मागणार्या आम्हा मंडळींना कधीही हिडीसफिडीस किंवा कमी लेखत नसत. हे फार मोठ्या मनाचे लक्षण आहे हे आता क्षणोक्षणी ध्यानात येते. म्हणूनच तर मला ते नेहमी मराठवाड्याचे साने गुरुजीच वाटत आले आहेत.
मी तर त्या काळात वडिलांबरोबर त्यांच्या भावाकडेही दादरला जात असे. तेही खूप माया करीत. सर्व कुटुंबच मोठे मृदु स्वभावाचे व परोपकारी वागणारे. मराठवाड्यात कित्येक वेळा वादळी चर्चा होत, बोलाचाली होई. पण मी कधीही केशवरावकाकांना त्यांचा मृदूपणा सोडलेले पाहिले नाही. इतका सोज्वळ मृदू स्वभाव सर्व परिस्थितीवर मात करीत नजरेत भरून राही.
जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला, असे साने गुरुजींचे वचन आहे, ते खास केशवरावकाकांसाठीच जणुं केले असे वाटते. मराठवाड्याच्या ह्या साने गुरुजींच्या आत्म्यास शांती मिळो, कुटुंबियास त्यांच्या पश्चात कालक्रमणा करतांना धैर्य मिळो, हीच ईच्छा !
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com
Monday, December 27, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
केशवरावांचं अरूण भालेराव यांनी केलेलं वर्णन अगदी योग्य आहे. केशवरावांचे गुण, त्यांच्या स्वभावाचे पैलू अरूण भालेराव यांनी मांडलेत. कित्येकाना त्यांच्या वरील गुणांचा अनुभव अनेकांना आला आहे. मला तर फार.
ReplyDeleteअरूण भालेरावांच्या केशवरावांबद्दलच्या भावना कातर आहेत, स्पर्शणाऱ्या आहेत.
पण केशवरावांची तुलना साने गुरुजींशी कशाला. एकाद्या माणसाचं थोरपण, त्याचं वेगळेपण, त्याचे गुण स्वतंत्रपणे कां पहाता येऊ नयेत. जगात कशावरही काहीही लिहायचं तर जगातल्या कुठल्या तरी नावाजलेल्या माणसाची तुलना करायलाच हवी काय.
निळू दामले
करूणे मध्ये अगदी अंतिम चरणावर आपण बहुतेक गौतम बुद्धाला ठेवतो. तसेच कोणी फारच मृदू आणि अगदी सरळ स्वभावाचा माणूस असेल तर तो साने गुरुजीच वाटतो. ह्यात तुलना करण्यापेक्षा ज्याची उपमा आपण देतो त्याचे प्रकर्षाने भावलेले गुण उत्कट होऊन येतात. हे एक अंतिम परिमाणच आपण मग मानतो. आपण एरव्ही नाही का म्हणत "ही आमच्या घरची लक्ष्मी आहे". किंवा हा संपादक म्हणजे मराठवाड्याचा अरुण शौरी आहे. ह्यात सन्मान करण्याचाच भाग असतो.
ReplyDeleteअरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com