द भालेराव-----१६
प्रदीपचे जल-निर्वाण !
आयुष्याचे मोठे गमतीचे असते. ते असते तेव्हा जाणवत नाही व नसते तेव्हा ते ताणवत रहावे असे वाटत राहते.
प्रकाश चिटगोपेकरचा भाऊ व तितकाच दुसर्या टोकाचे व्यक्तिमत्व असलेला प्रदीप चिटगोपेकर गेला, तेव्हा त्याचे हे जल-निर्वाण अकालीच झाले असे वाटले. बदलापूरच्या स्मृति-गंधच्या मेळाव्यात आपण त्याचा सत्कार करतोकाय, त्याच्या "जल-संवाद" ह्या मासिकाबद्दल अचंबित होतो काय आणि एक वर्ष होत नाही तोच, त्याच्या नसण्याची हळहळ जाणवावी, ही काळाची अगाध करणीच म्हणावी लागेल.
व्यक्तिमत्वांची खरी ओळख बर्याचदा फसवी असते, हेच जणु, प्रकाश व प्रदीप ह्यांनी जाणवून दिले आहे. प्रकाश चिटगोपेकर दिसायला जितका मनमुराद, उन्मुक्त वाटायचा, तितकाच तीव्र चिकाटीचा निघाला. सलमान खानचा जो डायलॉग आजकाल प्रसिद्ध आहे ( जब मै एकबार कमिट करता हूं तो फिर मै खुदकी भी नही सुनता ), त्याची आठवण करून देणारी त्याची ही चिकाटी होती. सत्तेच्या राजकारणाला कोणीही चिकटून राहू शकतो. कारण त्यात फायदेच असतात. पण कायम विरोधकांबरोबर राहणे, त्या कमिटमेंटचे सर्व धोके सहन करणे ह्याला पराकाष्ठेची चिकाटी लागते. प्रकाशने ते धारिष्ट्य शेवटपर्यंत प्राणपणाने जपले होते. प्रदीपही त्याच चिकाटीचा निघाला . ती जशी प्रकाशकडे होती तशीच चिकाटी प्रदीपनेही दाखवली, ती त्याच्या "जल-संवाद" ह्या मासिकावरून व ते नेटाने चालवण्यावरून.
आपण पाण्याचे महत्व नुसते निबंधापुरते वाखाणतो. त्याला जीवन म्हणतो. पण पाणी व तत्सम प्रश्नांकडे कायमच दुय्यम महत्व देतो. पण त्यालाच शिरोधार्य ठरवीत, त्यावर, केवळ पाणी-प्रश्नावर, एक मासिक चालवणे हे फारच जगावेगळे धाडस होते. बरे त्याच्या सौम्य व्यक्तिमत्वाच्या अगदी विरोधी गुणांचे हे काम होते. तरीही त्याने ते चिकाटीने रेटले आणि हेच फार कौतुकास्पद आहे.
माझे वडील वारले तेव्हा त्यांच्या स्मरणार्थ शिऊरच्या मंदीराला काही देणगी द्यावी, असे मी मनात योजत होतो. अनायासे शिऊरहून काही वारकरीही आलेले होते. मी त्यांना तसे बोलून दाखवले. त्यावर त्या खेडवळ माणसाने जे सांगितले तो माझ्या समजूतीने "श्रद्धांजली कशी अर्पण करावी" ह्याचा श्रेष्ठ पाठच होतो. त्याने विचारले होते की तुम्हाला असे का वाटते ? त्यावर मी स्पष्ट केले की माझ्या वडिलांची वारकरी संप्रदायाप्रती अपार श्रद्धा होती व त्या मार्गावर त्यांचा लोभ होता, असे मला त्यांचे काही लिखाण वाचून वाटते. ह्यावर तो खेडुत म्हणाला होता, मग तुम्हाला त्यांच्याबद्दल तसे काही करावे असे वाटतेय तर तुम्ही वारकर्यांबद्दल, त्यांच्या भक्तिमार्गाबद्दल जातीने काही वाचा, अनुभवा. तीच मोठी श्रद्धांजली होईल. त्यानंतरच मी तुकाराम, ज्ञानेश्वर वगैरे संतसाहित्याचा अभ्यास करण्याचे ठरविले व अजून ते चालू आहे.
ह्याच दृष्टीने प्रदीपला खरी श्रद्धांजली द्यायची, तर पाण्यासंबंधी काही लिहावे असे ठरवून सध्या जगात पाण्यावर जे संशोधन चालू आहे त्याचा मागोवा घेणारा एक लेख मी तयार करीत आहे. त्यातली एकच गोष्ट इथे नमूद करतो. आपल्याकडे बच्चाबच्चा जाणतो की पाण्याची रासायनिक संज्ञा "एच-टू-ओ" ( H2 O ) अशी आहे. पैकीच्या पैकी मार्कांसाठी, आपण घोकतो की हायड्रोजनचे दोन अणू व ऑक्सिजनचा एक अणू, अशा संयोगाने पाणी तयार होते. हेच आपण कितीही ज्यास्त शिकलो तरी मानत जातो. पण संशोधक म्हणतात, ह्यातले हायड्रोजनचे दोन अणु हे पक्के दोन नसून थोडे कमी आहेत. जसे: १.९ . आहे की नाही आपल्या समजूतीला धक्का देणारे. अशाच काही गोष्टी ह्या निमित्त मी गोळा केल्या आहेत.
हा लेखच माझी प्रदीप चिटगोपीकरच्या जल-निर्वाणाला खरी श्रद्धांजली आहे ! त्याच्या कुटुंबियांना त्याच्याशिवाय जगताना बळ मिळो हीच प्रार्थना !
----अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com
Friday, April 29, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment