कै. दुर्गामामी,
सौहार्दाचा पुतळा,
----------------------------------------
लहानपणापासून मला
जरा प्रौढ व्यक्तींचा सहवास लाभलेला होता. हैद्राबादला आमच्याकडे जवळ जवळ एक
क्रिकेट टीम भर विद्यार्थी होते. त्यातले माझे काका मेडिकलला, मनोहर व्हेटरनरीला,
तर दत्तामामा एम ए ला होते. ( आणि मी सातवीला.). ह्या सगळ्यात अगदी मवाळ, सौजन्यपूर्ण
व हळवे असे होते दत्तामामा. त्यांचे सगळे काम अगदी टापटीपीचे असायचे. कंदिलाची काच
अगदी लख्ख पुसायचे. अभ्यास तर अगदी शिस्तपूर्ण असायचा. साने गुरुजींना मी काही पाहिले
नव्हते, पण दत्तामामांसारखेच ते दिसत असणार असे मी ताडीत असे. कारण दोघेही साक्षात
मृदूपणाचे आदर्श असे.
दुर्गामामी
जेव्हा मॅट्रिकला होत्या तेव्हा कसल्या तरी स्पर्धेला सेलूहून हैदराबादला आल्या
होत्या. अप्रतीम सात्विक सौंदर्य लाभलेल्या. पुढे त्यांचे दत्तामामांशी लग्न
झाल्यावर त्यांच्याकडे मी काही दिवस राहायला जात असे. तेव्हा माझ्या मनात पक्के
झाले की नुसतेच सात्विक सौंदर्य नाही, तर सौहार्दाचा पुतळा कोणाला करायचा असला तर
खुशाल त्यांचा पुतळा करावा इतके ओतप्रोत सौहार्द त्यांच्या संसारात भरलेले होते.
ते अगदी शेवटपर्यंत होते. त्यांच्या शेवटच्या आजारात मी काही भेटायला जावू शकलो
नाही, पण माझा धाकटा भाऊ, निशिकांत सांगत होता की त्या स्वतः श्वासाच्या इतक्या
त्रासात होत्या, तरी भेटायला आल्याबद्दल त्याला आभाराचे सांगत होत्या.
त्यांच्या सगळ्या
कुटुंबातच जो सुस्वभावी लोकांचा भरणा आहे, त्याचा मूळ स्त्रोत त्याच आहेत हे मला
अगदी मनोमन पटलेले आहे. आणि मूर्तिमंत सौहार्द कसे असते हे कोणालाही पहायचे असले
तर केवळ त्यांच्याकडे पहावे !
त्यांच्या मुलांनी
त्यांच्या आजारात खूप केले. पण आता ही सौहार्द-मूर्ति दिसणार नाही हे फार मोठे
वैषम्य राहणार आहे !
त्यांच्या आत्म्याला शांती तर लाभोच, पण त्यांच्या स्मृतीनेही आमच्या वागण्यात थोडे तरी
सौहार्द दरवळो अशी प्रार्थना व त्यांना
श्रधांजली !
-------------------------
No comments:
Post a Comment