दा.गो.--- एक सिनिक था
-------------------------------------
दा.गो.देशपांडे हे खरे तर
माझ्या वडिलांचे मित्र. पण त्यांना मित्र म्हणता येईल इतके त्यांचे प्रेम माझ्या
वाट्याला आले होते. इंग्रजीत “गार्डियन एन्जेल” अशी एक कल्पना आहे. तीत कोणी एक देवदूत आपले रक्षण करतो
आहे, अशी योजना दाखविलेली आहे. दा.गो. हे सगळ्याच अर्थाने माझे गार्डियन एन्जेल
होते. माझ्या मूर्खपणाने माझी जेव्हा पुण्यातली नोकरी गेली, तेव्हा मी मुंबईला
मेट्रो समोरच्या दा.गों च्या ऑफिसात उभा राहिलो आणि मला काहीही न सुनावता, त्यांनी
मला मुकंद कंपनीत नोकरी देवविली. त्याला आज बावन्न वर्षे झाली !
दा.गो. त्याकाळी “सिनिक”
ह्या नावाने छोटेखानी कथा लिहीत , ज्याला ते सिनिकथा असे संबोधित. त्यांचे हे
सिनिक असणे मोठे विलोभनीय होते. लोक स्वार्थीपणे वागतात असे मानणारा तो सिनिक, असा
एक सिनिकचा अर्थ शब्दकोशात देतात आणि स्वतःच्या दिलदार वागण्याने त्यांनी तो सार्थ
केला.
स्वतः नास्तिक असल्याचे
ते दाखवत, पण त्यांनी बायकोला त्यांच्या पूजा अर्चा सकट जो मान दिला तो त्यांचा मोकळा
स्वभाव मोठा लुभावणारा होता. ते स्वतः जसे मनमानी तसेच त्यांनी मुलांचे मनमानीपण
अपार प्रेमाने जपले होते.
खणखणीत मोठ्या आवाजात “अरे,
केव्हढी ही ढेरी !” असे चक्क समोर म्हणणारा आवाज जरी आज लुप्त झाला असला तरी ते
माझ्यावर सदैव गार्डियन एन्जेल सारखे लक्ष देऊन असतील, अशी माझी खात्री आहे.
त्यांच्या कुटुंबियांना
त्यांचा विरह सुसह्य होवो हीच प्रार्थना व श्रद्धांजली.
----------------------------
No comments:
Post a Comment