Saturday, November 12, 2011

अभिमान बाळगावा असे डॉ.अहंकारी
६ नोव्हेंबर २०११ ला औरंगाबादी "अनंत भालेराव-स्मृती-पुरस्कार" डॉ.शशिकांत अहंकारी ह्यांना देण्यात आला. डॉ.अहंकारी व त्यांच्या गायनॅकॉलॉजिस्ट पत्नी डॉ.शुभांगी अहंकारी हे दांपत्य, एका खेड्यात ( अणदूर, तुळजापूर तालुक्यात, उस्मानाबाद जिल्ह्यात, सोलापूर पासून ४० किमी वर हे खेडे आहे) एक अतिशय मोलाचे काम करीत आहेत त्याचा हा सन्मान आहे.
अणदूर ह्या खेड्यात अहंकारींनी हॅलो ( हेल्थ ऍंड ऍटो लर्निंग ओर्गनाइझेशन ) नावाची संस्था काढली आहे. सुरुवात त्यांच्या आईच्या नावे काढलेल्या "जानकी रुग्णालया"ने झाली व सध्या त्यांचा "भारत-वैद्य" नावाचा प्रकल्प सरकारनेही वाखाणला आहे. गावोगावच्या खेड्यापाड्यातून थोड्याशा ( इयत्ता ८ ते १२) शिकलेल्या स्त्रियांना ते एक महिन्याच्या प्रशिक्षणात प्राथमिक आरोग्याचे व विशेषत: माता-बाल-संगोपनाचे प्रशिक्षण देतात. ह्यांना ते "भारत-वैद्य" म्हणतात. मग ह्या भारत-वैद्य स्त्रिया त्यांच्या गावात घरोघरी जाऊन प्राथमिक आरोग्य-सेवा देतात. हे काहीसे चीनच्या बेअर-फुट डॉक्टर्स सारखेच आहे. ह्या मूलभूत प्रशिक्षणाला हलके लेखू नका. कारण ह्या मूलभूत ज्ञानामुळे लबाड डॉक्टरांची ह्या खेडवळ स्त्रिया कशी बोबडी वळवतात त्याचा एक किस्सा ऐका. एका मुलाच्या पोटात खूपच दुखत असते. प्राथमिक उपचाराने बरे वाटत नाही. मग शेजारीपाजार्‍यांच्या मदतीने ती भारत-वैद्य त्याला शहराच्या ठिकाणी घेऊन जाते. शहरातला डॉक्टर म्हणू लागतो ह्याच्या पोटात डावीकडे जे दुखते आहे ते ऍपेंडिक्स मुळे व ते फुटायच्या आत त्याचे ऑपरेशन करणे जरूरीचे आहे व त्याला साधारण दहा हजार खर्च येईल. भारत-वैद्य म्हणते की आम्हाला शिकवले आहे की ऍपेंडिक्स तर उजवीकडे असते तर मग हे दुखणे ऍपेंडिक्सचे कसे असेल ? त्या पोराचे दुखणे मग दुसर्‍या डॉक्टराकडून मिटवल्या जाते व लबाड डॉक्टरांची लबाडी एका प्राथमिक आरोग्याच्या शिक्षणाने उघडकीला येते.
डॉ. अहंकारींनी अतिशय कल्पकतेने "माता-दत्तक-योजना" तिथे राबवली आहे. वस्तीतल्यांच्या मदतीने तिथली भारत-वैद्य स्त्री गरोदर मातेला दत्तक घेते. तिने १२ आठवड्याच्या आत दवाखान्यात नाव नोंदवले का नाही, धनुर्वाताची तीन इंजेक्शने घेतली की नाही, शंभर लोहगोळ्या घेतल्या की नाही व योग्य आहार वेळच्या वेळी घेतला की नाही ही अगदी प्राथमिक आरोग्याची काळजी वाहते. ह्या जुजबी काळजीमुळे माता-बालक-मृत्यूचे प्रमाण घटते, व आयुष्याची सुरुवात नेमकी व विश्वासक होते. ह्यामुळेच सोलापूरच्या गरीब वस्त्यात ते ह्या चळवळीचे नाव "शुअर स्टार्ट" असे ठेवतात जे अतिशय चपखल असेच आहे.
स्त्री-भ्रूण-हत्या विरोधात काम करीत असताना डॉ. अहंकारी एक विदारक प्रसंग सांगतात, ज्यामुळे कोणाही पुरुषाला लाज वाटावी. त्यांची एक कार्यकर्ती असते. ती सरपंच म्हणून निवडून येते. नवर्‍याचा प्रथम पाठिंबा असतो. पण नंतर तिच्या कामामुळे तिचे जागोजागी सत्कार व्हायला लागतात. ते सहन न होऊन मग तो तिला मारहाण करायला लागतो. बाईला एके वेळी भर सभेत तिच्या पाठीवरचे वळ दाखवावे लागतात. ह्या पुरुषी अहंकारामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना आजही प्रचंड त्रास होतो. कदाचित ह्या पुरुषी अहंकाराची सतत जाणीव रहावी म्हणूनच स्वत: अगदी निर-अहंकारी आणि कोणीही अभिमान बाळगावा असे ते असूनही डॉक्टरांनी अहंकारी हे आडनाव अजूनही जपले असावे.
डॉ. अहंकारींच्या अनेक प्रकल्पांना नामवंत संस्थांचे पाठबळ मिळते आहे. त्यात ऑक्सफॅम, फोर्ड फौंडेशन, युनिसेफ, स्विस-एड, सिद्धिविनायक ट्रस्ट, महाराष्ट्र फौंडेशन, व पाथ ह्या सेवाभावी संस्था त्यांच्या प्रकल्पांचा मरातब वाढवतात. जगन्नाथाच्या रथाला जसे जितकी माणसे ओढतील तितके ते दैवत सहजी विराजेल, तसेच मानून लोकांनी ह्या संस्थेला अवश्य मदत करावी. त्यांचा पत्ता आहे : हॅलो मेडिकल फौंडेशन, जानकी रुग्णालय, अणदूर, ता.तुळजापूर, जि.उस्मानाबाद--पिन कोड: ४१३६०३ ( महाराष्ट्र ) व ई-मेल : shashikant.hmf@gmail.com आणि संकेत-स्थळ आहे: www.halomedicalfoundation.org

-------------------------------------------
अरुण अनंत भालेराव

No comments:

Post a Comment