Thursday, November 17, 2011

सु-बापू काळदाते
मराठीत शब्दाच्या आधी सु हा प्रत्यय आला की त्या शब्दाचा अर्थ चांगलाच होतो असे आढळते. बापू काळदाते ह्यांनाही सु ( सुधाताई ) च्या टापटिपीचा प्रत्यय आला तेव्हाच त्यांचे जीवन चांगल्या अर्थाचे झाले असावे. बापूंबरोबर सुधाताईंची आठवण होण्याचे कारण बापू तेव्हा एक सेवादलाचे कार्यकर्ते म्हणून हैद्राबादी आमच्याकडे आले होते. खादीचे कपडे, एक शबनम बॅग व खळखळून बोलणे, हसणे ह्यांनी तेव्हा आमच्या घरावर त्यांचा खूपच प्रभाव पाडला होता. बैठकीत गप्पा चालत तेव्हा कोपर्‍यातल्या टेबलाखाली बसून मी काहीबाही वाचत असे व गप्पांकडे लक्ष ठेवून असे. बापूंची पिशवीही टेबलाजवळच होती. सातवीतल्या मुलाच्या उत्सुकतेला त्यातली एक फाईल बघाविशी वाटली. आणि आदर्श प्रेमपत्रे कशी असावीत त्याचा वस्तुपाठच मला वाचायला मिळाला. बापू व सुधाताईंनी एकमेकाला लिहिलेली प्रेमपत्रे त्यात नीट फाईल केलेली होती. त्यावेळेस सुधाताई सु हे टोपणनाव वापरीत असाव्यात, कारण पत्रांच्या मायन्यात "प्रिय सु" असे असायचे.
पुढे सुधाताईंचे बापूंशी लग्न झाल्यावर त्या पहिल्यांदा औरंगाबादी आल्या तेव्हा त्यांना आणायला रेल्वे-स्टेशनवर मीच एकटा गेलो होतो. आता मी मॅट्रिकला होतो. त्या पहिल्या भेटीतच सुधाताईंचे वेगळेपण अनुभवायला आले. आम्ही रीतसर स्टेशनबाहेर येऊन टांग्यात बसलो ( त्याकाळी घोड्याचे टांगेच होते ), अर्ध्या रस्त्यावर आलो आणि सुधाताईंच्या लक्षात आले की एक होल्डऑल उतरताना काढून घ्यायचाच राहिला. आम्ही परत स्टेशनवर गेलो. सुधाताईंनी डब्याचा नंबर टिपून घेतलेला होता. तोंवर डब्यांना नंबर असतात हेही मला माहीत नव्हते. स्टेशनमास्तरला सांगून त्यांनी पुढच्या स्टेशनवर तो होल्डऑल काढून घेऊन तो परत पाठवण्याची व्यवस्था करून घेतली आणि संध्याकाळपर्यंत तो होल्डऑल औरंगाबादी पोचलाही. त्याकाळी रेल्वेकडून असले अचाट कर्त्तत्व करवून घेणा‍र्‍या त्या एक धाडशी महिला होत्या.
बापू जरी राजकारणातल्या रुक्ष व्यवहारात गुंतलेले असायचे तरी त्यांनी रसिकता चांगलीच जपलेली होती. आणि ते त्यांच्या सेवादलात असण्यापासून दिसत होते. वसमतला वीस दिवसांचा सेवादलाचा कॅंप होता. त्याला मी होतो. आता कॅंपचे सगळे कार्यक्रम बापूंनी रीतसर घेतले व त्यात कमाल म्हणजे त्यांनी आम्हा मुलांना तिथून नांदेडला नेले, आठवडाभरासाठी. तिथे नरहर कुरुंदकर आम्हाला जीवनराव बोधनकरांच्या घरी, रोज दोन तीन तास, मर्ढेकरांच्या कविता समजावून सांगत. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना त्या काळात एका सेवादलाच्या कार्यकर्त्याने नरहर कुरुंदकरांसारख्या व्यासंगी साहित्यिकाकडून, मर्ढेकरांच्या कवितांची ओळख करून द्यावी, ह्यात त्यांच्या रसिकतेची प्रगल्भ जाणच दिसून येते आणि इथे परत हे वा.गो.मायदेव ह्या प्रसिद्ध कवीची मुलगी असलेल्या सुधाताईंचे त्यांना प्रत्यय असल्याने झाले असावे, हेही उघड होते.
राजकारणात नुकत्याच पदार्पण करतानाचे बापूंचे उमेदीचे दिवस ( एका विद्यार्थ्याच्या नजरेने ) मी अगदी जवळून पाहिले आहेत. जेव्हा पब्लिक-स्पीकींग म्हणजे काय असते हे कोणालाही माहीत नव्हते, तेव्हा बापू एखाद्या भाषणाची तयारी आरशासमोर उभे राहून तासन्‌ तास करताना मी पाहिलेले आहे. एखादे कसब कमवायचे तर त्याचा शास्त्रोक्त अभ्यास व सराव करावा हा दृष्टिकोनच मोठा उमदा आहे. असेच समाजवाद कसा असावा, हे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाह्यला मिळालेले ते एक अपवादात्मक समाजवादी आहेत. कारण त्या काळात ते इस्त्राईलला जाऊन त्यांच्या पंतप्रधानाला, बेन गुरियान, ला भेटून आले होते. त्यांनी सांगितलेली एक समाजवादाची प्रचीती मला अजून लक्षात आहे. बापूंची भेट झाल्यावर बेन गुरियान बापूंना कारने पोचवायला आले होते व नंतर स्वत: बसच्या लाइनीत उभे राहिले होते. आजकालच्या बरबटलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर तर वाटते, समाजवाद असावा तर असा !
त्या काळात समाज कार्याला झोकून दिलेले हे मोठे मोहक दांपत्य होते. बापू दौर्‍यात व्यस्त असत, तर सुधाताई खेड्यापाड्यांनी सोशल वर्करचे काम करीत असत. त्या दरम्यान त्यांच्या पहिल्या मुलीचे, कांचनचे, संगोपन करण्यात मला खारीचा वाटा उचलायला मिळाला ह्याचे मला खूप अप्रूप आहे. ज्यांनी एका ध्येयापायी आपला संसार पणाला लावला, त्यांना देवाने सोन्यासारख्या मुली द्याव्यात, हा दैवी न्यायच म्हणायला हवा ! असेच त्याने सुधाताईंना बळ व बापूंच्या आत्म्याला शांती द्यावी !

----------------------------------------------
अरुण अनंत भालेराव

-----------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment