Sunday, September 15, 2013



---------------------------------------
सुधाताई काळदाते
-----------------------
मी तेव्हा मॅट्रिकला होतो. औरंगाबादच्या स्टेशनावर त्यांना घ्यायला गेलो होतो. त्या अगोदर हैद्राबादी असताना बापू काळदाते आमच्याकडे येत असत. तेव्हा आमच्या बैठकीच्या खोलीत एक टेबल असे. त्याखाली बसून मी जे काहीबाही वाचे त्यात मी बापूंच्या फाईलीतली त्यांनी सुधाताईंना लिहिलेली प्रेमपत्रेही वाचलेली होती. बापूंच्या पत्रांचा मायनाच मोठा रोमांचकारी असे. ते लिहीत: "प्रिय सु".
त्यावरून कोणीतरी सुंदर नखरेल मुलगी असावी असे वाटून मी त्यांची वाट पाहात होतो. तर, ह्या बाई आपले सामान स्वत: उचलत, टांगेवाल्याला पत्ता सांगत होत्या व मला पुढे टांगेवाल्याशेजारी बस म्हणत बसल्याही. मध्येच अर्ध्या वाटेवर त्यांच्या लक्षात आले की त्यांचा होल्डऑल गाडीतच राहिला होता. त्यांनी लगेच टांगा परत वळवायला सांगितला. त्या काळात डब्यांबर काही पाच आकडी नंबर असत व त्यांनी आपल्या डब्याचा नंबर लिहून ठेवलेला होता. त्यांनी स्टेशन-मास्तरांना सांगून पुढील स्टेशनावर तो होल्डॉल उतरवून घ्यायची व्यवस्था केली होती. संसार थाटायला औरंगाबादी आलेली एक स्वप्नाळू मुलगी ( प्रसिद्ध रविकिरण मंडळाचे कवि वा.गो.मायदेव ह्यांची मुलगी ) प्रत्यक्षात हे अवघड काम सहजी फत्ते करून दाखवीत होती. पहिल्याच दिवसांपासून मी सुधाताईंचे हे कर्तृत्व पाहिलेले होते.
पुढे त्यांनी औरंगाबादच्या आजूबाजूच्या खेड्यात सामाजिक कार्यकर्ती म्हणून जे काम केले त्याची रोजची वर्णने त्या आम्हाला रात्रीच्या शिळोप्याच्या गोष्टींसारख्या सांगत असत. आज एका बाईने उगाच उपदेश करू नकोस, भाकर्‍या करून देतेस का असे म्हणून कसे आवाहन दिले होते ते एक दिवस त्या सांगत व त्याचबरोबर तिथेच तिला कशा भाकर्‍या करून दिल्या त्याचेही वर्णन त्या खेळीमेळीने सांगत असत.
बापू त्या काळी राजकारणात भटकंती करीत असताना, नोकरी, पिएच.डी व दोन मुलींची देखरेख त्या कशी करीत असत हे मी फार जवळून पाहिलेले आहे. कांचन लहान असताना मी तिची तासन्‌ तास सोबत केलेली आहे. आदर्श जोपासणे व संसारही नेकीने प्रेमाने कसा करावा ह्याचा वस्तुपाठच त्या वेळी आम्हाला देत होत्या.
एकदा वा.गो.मायदेव औरंगाबादी आलेले असताना त्या काही कारणांनी दु:खीकष्टी झालेल्या असताना मला सांगत होत्या की अपेक्षा केल्या ना की दु:ख होतेच ! काळाच्या पाशात अडकून न राहता आपला आदर्श संसार कसा करावा हेच त्यांनी आपल्या जगण्याने दाखवून दिले होते. जणु काही वडिलांच्या ( वा.गो.मायदेवांच्या ) एका प्रसिद्ध कवितेच्या ओळींसारखे :
" हे पंजरस्थ पक्षा, नुसते कशास गाशी ?
हो काय, गाऊनिया, गुंतून काळपाशी ! "
काळाच्या पाशाला तोडून काळाचे दान देणार्‍या सुधाताई काळदातेंचे स्मरण मला कायमच होत राहील , होत राहू दे !
-------------------------------------------

No comments:

Post a Comment