Thursday, October 5, 2017विद्याधर पानट व प्रताप
माझे मेहुणे डॉ प्रभाकर पानट ह्यांचे भाऊ डॉ. विद्याधर पानट उर्फ नंदू पानट ह्यांचे दि २९ सप्टेंबर २०१७ रोजी कॅंसरने निधन झाले.
अतिशय मृदू स्वभाव व तशीच सौम्य प्रकृती असलेले नंदू पानट माझ्या मनात राणा प्रतापसाठी ठाम लक्षात राहिलेले आहेत. आणि काय योगायोग, त्यांचा फोटो शोधत असताना गुगलच्या इमेजेस मध्ये panat on Rana Pratap असे लिहिल्याबरोबर क्षणात मिळाला. त्यांनी राणा प्रताप वर जी असंख्य भाषणे दिली, त्यावर संशोधन केले त्याला मिळालेली ही पावतीच आहे.
इतकी सौम्य प्रकृती असलेल्या ह्या माणसाचे धैर्य अगदी वाखाणण्यासारखे आहे. त्यांनीच मला एकदा सांगितले होते की एका शुक्रवारी ( जुम्मा ) त्यांनी मशिदीत जाऊन राणा प्रतापवर व इतर विषयांवर भाषण दिले होते. भल्याभल्यांना न जमणारे हे काम आहे.
गावकरी, जळगाव आवृत्तीचे ते संपादक होते. अध्यात्मात तर त्यांची खूपच वरची तयारी होती.
त्यांच्या मागे त्यांच्या पत्नी लता ह्यांना सांत्वनासाठी भेटायला जायची माझ्या पत्नीची खूप इच्छा होती पण राणा प्रतापाच्या करारी बाण्याने त्यांनी म्हणे लिहून ठेवले होते की माझ्या स्मरणात फक्त दोन झाडे लावा, इतर काही करू नका.
शेवटपर्यंत राणा प्रतापाचे प्रताप गाण्याराने तितक्याच करारीपणे जगाचा निरोप घेताना जो साधेपणा जपला त्याला कोटी कोटी प्रणाम व श्रद्धांजली.

------------------

Monday, August 28, 2017

वसंत पांडव
-------------------
औरंगाबादचे गव्ह. आर्ट्स, सायन्स कॉलेज मोठे गंमतीशीर होते. एक वर्ग वर, तर दुसरा खाली व आसपास मोठ्ठाली झाडे होती. एकदा एका झाडाखाली तीनचार मुले अभ्यास करीत होती. पांढरा मांजरपाटाचा पायजमा-सदरा घातलेली गावाकडची मुले. ह्यांना काय येत असेल, बघू या तरी अशा आविर्भावात मी बघायला गेलो तर त्याच दिवशी शिकवलेल्या गणितातली अवघड गणिते ती मुले अगदी तोंडी सोडवत होती. ते पाहूनच मी त्याच क्षणी वसंत पांडवला मानला व माझी त्याची दोस्ती झाली.
त्याच्या मुलांनी औरंगाबादला सरस्वती भुवन मध्ये शिकावे अशी त्याची खूप इच्छा होती. पण काही नियमांनी ते तेव्हा जमले नाही.
मराठवाड्यातल्या मुलांसाठी खूप काही करण्याची त्याची तळमळ होती व त्याच्याच ध्यासापायी हा आपला स्मृती-गंध ग्रुप स्थापन झाला व वाढला.
तो जाणार हे तर सर्वांना कळलेच होते. तसे, तर आपण सगळे आपली वेळ आली की जाणार आहोतच, पण वसंत सारखे काही तरी ध्यास घेऊन काही करणे हे एखाद्यालाच जमते व त्याचसाठी त्याला श्रद्धांजली वाहताना थोडेफार आपल्यालाही जमो, अशी प्रार्थना करू यात !

---------------------   

Tuesday, August 1, 2017

कै. दुर्गामामी, सौहार्दाचा पुतळा,
----------------------------------------
लहानपणापासून मला जरा प्रौढ व्यक्तींचा सहवास लाभलेला होता. हैद्राबादला आमच्याकडे जवळ जवळ एक क्रिकेट टीम भर विद्यार्थी होते. त्यातले माझे काका मेडिकलला, मनोहर व्हेटरनरीला, तर दत्तामामा एम ए ला होते. ( आणि मी सातवीला.). ह्या सगळ्यात अगदी मवाळ, सौजन्यपूर्ण व हळवे असे होते दत्तामामा. त्यांचे सगळे काम अगदी टापटीपीचे असायचे. कंदिलाची काच अगदी लख्ख पुसायचे. अभ्यास तर अगदी शिस्तपूर्ण असायचा. साने गुरुजींना मी काही पाहिले नव्हते, पण दत्तामामांसारखेच ते दिसत असणार असे मी ताडीत असे. कारण दोघेही साक्षात मृदूपणाचे आदर्श असे.
दुर्गामामी जेव्हा मॅट्रिकला होत्या तेव्हा कसल्या तरी स्पर्धेला सेलूहून हैदराबादला आल्या होत्या. अप्रतीम सात्विक सौंदर्य लाभलेल्या. पुढे त्यांचे दत्तामामांशी लग्न झाल्यावर त्यांच्याकडे मी काही दिवस राहायला जात असे. तेव्हा माझ्या मनात पक्के झाले की नुसतेच सात्विक सौंदर्य नाही, तर सौहार्दाचा पुतळा कोणाला करायचा असला तर खुशाल त्यांचा पुतळा करावा इतके ओतप्रोत सौहार्द त्यांच्या संसारात भरलेले होते. ते अगदी शेवटपर्यंत होते. त्यांच्या शेवटच्या आजारात मी काही भेटायला जावू शकलो नाही, पण माझा धाकटा भाऊ, निशिकांत सांगत होता की त्या स्वतः श्वासाच्या इतक्या त्रासात होत्या, तरी भेटायला आल्याबद्दल त्याला आभाराचे सांगत होत्या.
त्यांच्या सगळ्या कुटुंबातच जो सुस्वभावी लोकांचा भरणा आहे, त्याचा मूळ स्त्रोत त्याच आहेत हे मला अगदी मनोमन पटलेले आहे. आणि मूर्तिमंत सौहार्द कसे असते हे कोणालाही पहायचे असले तर केवळ त्यांच्याकडे पहावे !
त्यांच्या मुलांनी त्यांच्या आजारात खूप केले. पण आता ही सौहार्द-मूर्ति दिसणार नाही हे फार मोठे वैषम्य राहणार आहे !
त्यांच्या आत्म्याला शांती तर लाभोच, पण त्यांच्या स्मृतीनेही आमच्या वागण्यात थोडे तरी सौहार्द दरवळो  अशी प्रार्थना व त्यांना श्रधांजली !
-------------------------

     

Thursday, March 23, 2017

ज्येष्ठ ऋषी : गोविंद तळवलकर
गोविंद तळवलकर अण्णांना ( आमचे वडील कै अनंत भालेराव ह्यांना ) भेटायला बऱ्याचदा आमच्याकडे येत असत. अनंतरावांचे बरेच अग्रलेख ते महाराष्ट्र टाईम्स मध्ये पुनःमुद्रित करीत असत.
बऱ्याचदा अनंतरावांच्या भोवती असलेल्या गराड्याला टाळून ते दोघेच तासन तास बोलत असत. अशावेळी त्यांच्या गंभीर चेहऱ्यावरून काही तरी गहन विषय वा राजकारणावर खलबत चालले आहे असे ताडता येई.
तेच गोविंदराव मग साहित्यिकांच्या मैफिलीत आले की हास्यविनोदात रमत असत.
अण्णांचा अंगरक्षक असलेला प्रदीप चिटगोपकर हा अण्णांच्या बऱ्याच मित्रांना टोपण नाव ठेवीत असे. त्याने तळवलकर, व शिरवाडकर ह्यांचे टोपण नाव ठेवलेले होते: ज्येष्ठ ऋषी. हे अतिशय मार्मिक नाव ह्यासाठी होते की त्यांची ज्ञानोपासना एखाद्या ऋषीसारखीच होती. शिवाय तो मुंबईहून निघाला की तळवलकरांसाठी  व औरंगाबादी जाताना नाशिकला शिरवाडकरांसाठी  न चुकता Old Monk घेवून जात असे.

---------------  

Saturday, January 3, 2015


अजातशत्रू शिवाजी क्षीरसागर 
------------------------------------------
जगाच्या जीवन-मरण्याच्या नियमात काही तरी बिघाड झालेला असावा . नाही तर अजातशत्रू असलेल्या आणि सर्वाबाबत अतिशय चांगले विचार बाळगणाऱ्या शिवाजी क्षीरसागरला असे अकाली मरण यावे हे अघटितच म्हणायला हवे. 
मी , शिवाजी , शरद मान्नीकार, मधू जामकर हे आम्ही हैद्राबादच्या विवेक वर्धिनीचे पाचवीपासून दहावी पर्यंतचे वर्ग -बंधू . शालेय जीवनाच्या असंख्य आठवणी आमच्या एकमेकात गुंतलेल्या आहेत. शिवाजी आमच्या शाळेतला स्कॉलर होता. खरे तर त्या काळात अर्धा एका मार्काचा फरक झाला तरी मित्रात काय भांडणे व्हायची . पण शिवाजीच्या स्कॉलरशिपचे आम्ही आनंदाने कौतुक करीत असू व शिवाजीही तेवढ्याच आत्मीयतेने तेव्हाच्या तुटपुंज्या ( साधारण सहा किंवा दहा रुपये असेल ) स्कॉलरशिपमधून आम्हाला इडली डोसाची पार्टी देत असे . पुढे त्याने काही वर्षे शिक्षण सोडून मुंबईला रिझर्व बँकेत नोकरी पत्करली होती तेव्हाही मुंबईला गेले की आम्ही शिवाजीच्या दिलदार पाहुणचारावर ताव मारीत असू . 
शार्दुलला मुंबईत नोकरी लागली होती तेव्हा आमची चांगली गळाभेट झाली होती. औरंगाबादी गेल्यावर तर त्याची हमखास भेट घेतच होतो. शमिकाच्या लग्नाला पापा कोरटकर व सगळे जुने वर्गमित्र भेटल्याने अपार आनंद झाला होता. त्यानंतर त्याला अमेरिकेला जायला मिळाले त्याने खूप बरे वाटले होते. 
पण एकाएकी असले दुर्धर दुखणे व्हावे काय व त्यात त्याची प्राणज्योत निवावी काय हे फारच अन्याकारक आहे असेच वाटते . इतक्या अजातशत्रू माणसाला नेण्याची घाई व्हावी ही नक्कीच चूक आहे . हे काही बरे नाही !
--------------------------------  

Saturday, December 20, 2014

सौ ताराबाई मेढेकरांना सादर प्रणाम !
ज्या सबला निज भाव-बलाने करिती सदने हरिहर भुवने !

जगात सगळ्या योग्य गोष्टींची दखल घेतली जातेच असे नाही. विशेषतः स्त्री-पुरुष समानतेत आपण जरा चुकतोच !

सौ. ताराबाई मेढेकरांच्या बाबतीत तर मला ही चूक खूपच खंत देवून जाते. संसार करताना कमावून आणणे हे जेवढे महत्वाचे वाटते त्यापेक्षा मुलांचे संगोपन करणे, घर चालवणे हे कितीतरी जिकीरीचे असते हे आता कोणालाही पटावे इतके उघड आहे. आणि सौ. ताराबाईनी कमावणे व घर चालवणे ही दोन्हीही कामे यशस्वीपणे केलेली होती. पण त्यांच्या हयातीत त्यांचे मोठेपण आपल्याला जाणवले नाही. दागो देशपांडे म्हणतात तसे हे आपले करंटेपणच म्हटले पाहिजे.

त्याशिवाय परिस्थिती बेताची असली की आहे त्या वेळेत सर्व सहन करावे लागते. ताराबाई जेव्हा शिकल्या व नोकरी करीत तेव्हा ते काम तसे धाडसाचेच होते व लोकांची नाही नाही ती बोलणीही सहन करावी लागत. तशात त्यानी संसार यशस्वीपणे तर केलाच शिवाय जी थोर माणसे भेटली ( जसे कहाळेकर महाराज वगैरे ) त्यांचाही मान राखला.

अप्पांच्या पश्चात त्या लगोलग निघून गेल्या त्यात त्यांची भावनिक धृडता दिसून आली त्या भाव-बलाला सादर प्रणाम !

--------------------------------------------

Friday, October 11, 2013----------------------------------------
सतीश मुळे ह्याचा विनोदी स्वभाव !
-----------------------------------------
सगळे चांगले असले की माणसाला विनोद सुचतात, पण सतीश मुळे असा वेगळा होता की अडचणीतही त्याला विनोद सुचत व त्यावर आम्ही अनेक वेळा हसलो आहे. त्याने अकाली जाऊन मात्र आम्हाला अडचणीत आणले आहे.
हा अगदी लहान असताना, म्हणजे पाचसहा वर्षांचा असताना, बाबुराव मामा ( त्याचे वडील ) त्याला हैद्राबादी घेऊन आले होते. त्यावेळी त्याला पायात मोठे मोठे बूट घालावे लागत असत. पण त्यातही तो त्याचा खेळकरपणा टिकवून होता. पुढे मेडिकल करताना तर केवळ त्याच्या कुशाग्र बुद्धीमुळे व स्मरणशक्तीमुळे तो डॉक्टरकी पूर्ण करू शकला. त्याला वाचायला खूप त्रास होई, तेव्हा त्याचे मित्र खोलीवर येऊन त्याला वाचून दाखवत व तेव्हढ्यावर ह्याने सगळ्या परिक्षा यथोचित पार पाडल्या होत्या. हे त्याचे यश फारच कौतुकास्पद आहे.
त्याला सिनेमा नाटकांची फार चांगली अभिरुची होती व त्यामुळे कुठलाही नवा हिंदी सिनेमा आला की हा त्या सिनेमातल्या डॉयलॉग्जवर इतकी टिंगल करी की त्यामुळे आम्हालाही विनोदाची, विडंबनाची जाण यायला लागली होती.
त्याचे वडील आमच्याकडे आले की आम्हा लहान मुलांची चांगलीच परिक्षा घेत व त्यातून सहीसलामत सुटणे हे फार जिकीरीचे काम असे. पण बाबुराव मामांचा वारसा चालवत सतीशने सर्व कौटुंबिक, सामाजिक जबाबदार्‍या यशस्वीरित्या व हसतमुखाने पार पाडल्या आणि आज मामा असते तर त्यांना त्याचा रास्त अभिमान वाटला असता.
सतीशच्या कुटुंबियांना ह्या संकटातून पार पडण्यासाठी बळ मिळो हीच प्रार्थना व सतीशला अनेक प्रणाम !
------------------------------------------