Sunday, May 23, 2010

द भालेराव-६

बदलती घरे, घरांचे बदलणे !

जे पुनर्जन्मावर विश्वास ठेवतात त्यांना वाटते ह्या जन्मी माझा वास ह्या शरीरात आहे. त्या अगोदर कदाचित माझ्या आजोबाच्या शरीरात वास असेल, त्या अगोदर कदाचित पणजी आजीच्या शरीरात असेल. असेच असते आपले निरनिराळ्या घरा घरात राहणे.जसा जीव रमतो, त्या त्या काळच्या देहात, तसेच आपले रमणे असते, वेगवेगळ्या घरात.
पण त्या त्या वेळी वाटत असते की कैक वर्षांपासून आपण ह्याच घरात राहतो आहोत. आणि त्या त्या घराची मग आपल्याला ओढ लागून राहते.
आता घाटकोपरच्या घरातच मला वाटते मला तीस वर्षे झालीत. आता इथेच...असे वाटू लागते न लागते तोच आठवते की त्या अगोदर दहा वर्षे इथेच जवळच्या घरात गेली होती. खरे म्हणजे सर्व प्रगती, मुले, त्यांची शिक्षणे, सुबत्ता, पाहुण्या रावळ्यांची वर्दळ वगैरे ह्याच घरात नांदली होती.
पण ह्या घरा अगोदर, ह्या घराची मुहूर्तमेढ रोवली गेली होती, कालीनाच्या घरात. केवढेसे छोटे घर, पण अगदी सोईचे. खरे तर हे होते ट्रेनी इंजिनियरांचे हॉस्टेल.पण बाल्कनीला आत घेऊन स्वयंपाकघर केलेले होते. ह्या घरातच माझ्य़ा मुलीचा जन्म झालेला होता.
आणि त्या अगोदरचे डोंबिवलीचे घर तर विसरणे अशक्यच. अवघ्या दोन खोल्या, स्टेशनपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर,गावाबाहेरच्या गोठया जवळ. पाणी विहीरीचे काढावे लागे. ह्याच घरात पत्नीचे पहिले गर्भारपण झाले. आयुष्या खडतर तर होतेच पण त्यातही एक गंमत होती. बॅंकेतले पहिले खाते इथेच काढणे झाले.
पुण्यातली एरंडवण्यातली खोली तर अगदी स्वप्नवतच होती. टुमदार बंगला व वर ऍटिक सारखी खोली. एका सडया माणसापुरती असलेली ही खोली पण ह्यात भास्करराव खरवडकर एम.डी.चा अभ्यास करायला राह्यले होते,चांगले तीन महिने. रमाकांत देशपांडे, प्रकाश खरवडकर वगैरे मित्रमंडळीही वरचेवर येत असत.
त्या अगोदर सहा महिने मी सन्मित्र कॉलनीतल्या घरात होतो. लेक्चररची नोकरी कधी एकदा सोडतो व घर कधी सोडतो असे झाले होते तेव्हा. अर्थात त्या घराचा त्यात काहीच दोष नव्हता. उलट ते माझ्या वडिलांचे सगळ्यात चांगले घर होते. त्यांचे त्या अगोदरचे चौधरी बंगल्यातले घर तर एखाद्या भुलभुलैय्या सारखेच होते. गच्चीवरच्या रंगीबेरंगी आरसे महालात मॅट्रिकचा अभ्यास करायला खूपच मजा आली होती. शिवाय खादीचे कपडे प्रशस्त हौदाजवळ टिनोपालने धुताना माझी जी तंद्री लागे ती एखाद्या अध्यात्मिक ध्यानाच्या तोडीची असायची.
त्या अगोदरच्या हैद्राबादच्या काचीगुड्याच्या घरात माझे पाचवी ते नववी पर्यंतचे शिक्षण झाले होते. ह्या घराची आठवण होते तेव्हा माणसांचे प्रचंड मोठे घोळके आठवतात. पाहुणे रावळे, कार्यकर्ते, विद्यार्थी, त्यांची क्रिकेटची टीम, त्यात माझे विकेट कीपींग असे प्रचंड घाई गर्दीचे दिवस आठवतात. त्यातच टेबलाखाली बसून दिवाळी अंकांचा हस्तलिखितातला साहित्य ठेवा मी वाचीत असे, गुपचूप.
त्या अगोदरचे प्राथमिक शिक्षणा दरम्यान घर होते सुलतान बाजारात. पारगावकरांच्या शेजारी. इथून शाळा अगदी जवळ असल्याने, शाळा सुटल्यानंतर मोकळ्या शाळेत खेळण्याचा अनोखा आनंद मला मिळाला. ह्या घराचा उंचच उंच जिना व त्यावरूनचे घसरणे मला चांगलेच आठवते. त्या अगोदरचे घर होते गामजी बिल्डींग मधले. पंधरा वीस बिर्‍हाडं एका बंगल्यात असलेली ही वास्तू. हीत अगदी अनोखी बाब होती, ती म्हणजे कम्यनिटी संडास. दहा पंधरा जणं, एकदम बसतील असा एवढा मोठा चराचा संडास.
त्या अगोदरचे आठवणारे घर म्हणजे आजोबांचे खंडाळ्याचे. प्रचंड मोठा वाडा. प्रवेशालाच एक धनगर जोडपे राखणदारासारखे रहात असे. त्यांचे लग्नही मला चांगले आठवते. माझी आजी चिंध्यांचा चेंडू करायची व माझे काका लोक त्याने धप्पाकुट्टी नावाचा खेळ खेळत. आजोबांच्या भजनाला आलेली मंडळी एकत्र परातीने चहा पीत असत.
अबब ! नुसती आठवणारी घरे वरची मोजली तर भरतील,बारा. आणि शिवाय पुण्याला माझी आत्ताची दोन घरे मोजली तर भरतील तेरा. आणि जनरीती प्रमाणे एक दिवस ही सगळी घरे सोडून मला जावे तर लागणारच आहे. मी कितीही कोणत्या घराबद्दल ममत्व जपले तरी !

अरूण अनंत भालेराव
९३२४६८२७९२
arunbhalerao67@gmail.com

3 comments:

  1. इतकी घर बदललेली वाचल्या वर खरच आश्चर्य वाटले. अर्थात या सगळ्या घरांच्या यादीत मी हि कुठेतरी तुझ्या कडे राहिलो होतो. मात्र स्वतःचे करिअर करण्या साठी (राहत्या घराच्या) बाहेर पडणाऱ्या तरुणाचे सहसा असेच असते. पक्का ठेपा होई पर्यंत भटकंतीच करावी लागते पण प्रत्येक ठिकाणच्या आठवणी असतातच. मागे वळून पाहताना त्या सगळ्या आठवणी समोर येत जातात. असो.
    माझ्या सारख्या मुलांना ज्यांना घर बदलण्याची क्वचितच शक्यता असते त्यांना मात्र घर बदलणे म्हणजे उध्वस्त झाल्याचा अनुभव असतो. अर्थात प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यात केंव्हा ना केंव्हा असा अबुभाव येतो.
    जाली तडातोडी
    अवघी पडिलो उघडी
    नव्हो कोणाचीच काही
    तुझे भरलिया वाही
    पारुषला संवसार
    मोडली बैसण्याची थार
    आता म्हणे तुका
    देवा अंतरे राखो नका (९८१)

    प्रभंजन

    ReplyDelete
  2. प्रिय प्रभंजन,
    इतक्या चांगल्या प्रतिसादाबद्दल अभिनंदन व आभार.
    मला तशी माया कमीच आहे. त्यामुळे असेल, पण घरांबद्दल मला ओढ कमीच आहे. वरच्या यादीत न गिनलेली घरे आहेत: वेस्ट इंडीजचे घर, बॅंकॉक ची दोन घरे, लहानपणची उन्हाळ्याच्य़ा सुट्टीत राहिलोले कळमनुरीचे दासरावमामांचे घर, खरवडकरांचे घर, आईबरोबर राहिलो होतो ते पेडगावकरांचे घर, शाळेच्या रस्त्यावर बरोब्बर मध्ये लागणारे अप्पा काकाचे घर ( तुळई वर त्याने लिहिलेले होते: राव बाई तेलंगी, बसा पलंगी ! ),नागनाथ काकांचे घर वगैरे.
    विसरलेली घरेच इतकी तर एकूण घरांबद्दल किती वाटावे ?
    न वाटण्याची शिक्षा अशी की डाएबिटीस झाला. ( sedantic lifestyle ने हा रोग होऊ शकतो असे म्हणतात.)
    असो, म्हणजे न व्होवो !
    अरूण भालेराव
    फिशला खाऊ घातले का ? माऊसच्या क्लिक ने ?

    ReplyDelete
  3. हो खाऊ घातले क्लीक करून. गोड साक्षात्कार ची comment बघ

    ReplyDelete