Monday, November 14, 2011

अभिमान बाळगावा असे डॉ.अहंकारी
६ नोव्हेंबर २०११ ला औरंगाबादी "अनंत भालेराव-स्मृती-पुरस्कार" डॉ.शशिकांत अहंकारी ह्यांना देण्यात आला. डॉ.अहंकारी व त्यांच्या गायनॅकॉलॉजिस्ट पत्नी डॉ.शुभांगी अहंकारी हे दांपत्य, एका खेड्यात ( अणदूर, तुळजापूर तालुक्यात, उस्मानाबाद जिल्ह्यात, सोलापूर पासून ४० किमी वर हे खेडे आहे) एक अतिशय मोलाचे काम करीत आहेत. त्याचा हा सन्मान आहे. हा २३वा वार्षिक स्मृती-पुरस्कार ह्या आधी निरनिराळ्या क्षेत्रातल्या प्रथितयशांना मिळालेला आहे, जसे: कुमार केतकर, वसंत पळशीकर, अप्पा जळगावकर, गोविंद तळवलकर, ना.धों.महानोर, मंगेश पाडगावकर, वगैरे.
अणदूर ह्या खेड्यात अहंकारींनी हॅलो ( हेल्थ ऍंड ऍटो लर्निंग ओर्गनाइझेशन ) नावाची संस्था काढली आहे. डॉ.अहंकारी औरंगाबादच्या मेडिकल कॉलेजात विद्यार्थी असतानाच युक्रांद वगैरे सारख्या चळवळीतल्या मित्रांना घेऊन सुट्ट्यात स्वयंसेवी आरोग्य सेवा आसपासच्या खेड्यात पुरवत असत. पुढे डॉक्टर झाल्यावर ह्या कामाची पूर्णवेळी सुरुवात त्यांच्या आईच्या नावे काढलेल्या "जानकी रुग्णालया"ने झाली व सध्या त्यांचा "भारत-वैद्य" नावाचा प्रकल्प सरकारनेही वाखाणला आहे. गावोगावच्या खेड्यापाड्यातून थोड्याशा ( इयत्ता ८ ते १२) शिकलेल्या स्त्रियांना ते ५० दिवसांच्या प्रशिक्षणात प्राथमिक आरोग्याचे व विशेषत: माता-बाल-संगोपनाचे प्रशिक्षण देतात. ह्यांना ते "भारत-वैद्य" म्हणतात. अशा ७५ भारत-वैद्य स्त्रिया ७० खेड्यापाड्यातून अवघ्या पाच रुपये/दर रुग्णामागे, एव्हढ्या अल्प खर्चात, हे आश्चर्यकारक काम करतात. ह्याबाबतीत त्यांचा एक नाराच आहे: "एसटीच्या खर्चात, उपचार गावात".मग ह्या भारत-वैद्य स्त्रिया त्यांच्या गावात घरोघरी जाऊन प्राथमिक आरोग्य-सेवा देतात. हे काहीसे चीनच्या बेअर-फुट डॉक्टर्स सारखेच आहे. ह्या मूलभूत प्रशिक्षणाला हलके लेखू नका. कारण ह्या मूलभूत ज्ञानामुळे लबाड डॉक्टरांची ह्या खेडवळ स्त्रिया कशी बोबडी वळवतात त्याचा एक किस्सा ऐका. एका मुलाच्या पोटात खूपच दुखत असते. प्राथमिक उपचाराने बरे वाटत नाही. मग शेजारीपाजार्‍यांच्या मदतीने ती भारत-वैद्य त्याला शहराच्या ठिकाणी घेऊन जाते. शहरातला डॉक्टर म्हणू लागतो ह्याच्या पोटात डावीकडे जे दुखते आहे ते ऍपेंडिक्स मुळे व ते फुटायच्या आत त्याचे ऑपरेशन करणे जरूरीचे आहे व त्याला साधारण दहा हजार खर्च येईल. भारत-वैद्य म्हणते की आम्हाला शिकवले आहे की ऍपेंडिक्स तर उजवीकडे असते तर मग हे दुखणे ऍपेंडिक्सचे कसे असेल ? त्या पोराचे दुखणे मग दुसर्‍या डॉक्टराकडून मिटवल्या जाते व लबाड डॉक्टरांची लबाडी एका प्राथमिक आरोग्याच्या शिक्षणाने उघडकीला येते.
स्त्रियांविषयीच्या अपार कणवेपायी डॉक्टर अहंकारी दांपत्याने अडाणी स्त्रीलाही समजेल अशा चाचण्या अमलात आणून रूढ केल्या आहेत. जसे एकदा एका मुलीने एका भारत-वैद्याला विचारले होते की "एचबी" म्हणजे काय ? त्यावर मग डॉक्टरांनी हेमोग्लोबीनचे गरोदरपणातले महत्व समजावून सांगितले व भारत-वैद्यांना शिकविले की फक्त बाळंतिणीची नखे बघा. ती फिकी असतील तर हेमोग्लोबिन कमी आहे, लोहगोळ्या द्या, लालसर असतील तर ठीक आहे. शोधाची जननी गरज असते, हेच इथे पहायला मिळते. असेच त्यांच्या प्रशिक्षणादरम्यान ते जे अभिनव प्रयोग योजतात त्याला दाद द्यावी. उदाहरणार्थ स्त्रीची शरीर-रचना समजावताना ते फरशीवर बाईची आकृती खडूने काढतात व मग त्यात यकृत, किडनी, योनी वगैरे अवयव रंगीत खडूने भरतात. हा ग्रामीण ऍनॉटॉमीचा वर्ग मोठा मनोहारी वाटतो व प्रभावीही.
डॉ. अहंकारींनी अतिशय कल्पकतेने "माता-दत्तक-योजना" तिथे राबवली आहे. वस्तीतल्यांच्या मदतीने तिथली भारत-वैद्य स्त्री गरोदर मातेला दत्तक घेते. तिने १२ आठवड्याच्या आत दवाखान्यात नाव नोंदवले का नाही, धनुर्वाताची तीन इंजेक्शने घेतली की नाही, शंभर लोहगोळ्या घेतल्या की नाही व योग्य आहार वेळच्या वेळी घेतला की नाही ही अगदी प्राथमिक आरोग्याची काळजी वाहते. ह्या जुजबी काळजीमुळे माता-बालक-मृत्यूचे प्रमाण घटते, व आयुष्याची सुरुवात नेमकी व विश्वासक होते. ह्यामुळेच सोलापूरच्या गरीब वस्त्यात ते ह्या चळवळीचे नाव "शुअर स्टार्ट" असे ठेवतात जे अतिशय चपखल असेच आहे.
सोलापूर हे अणदूरजवळ असलेले मोठे शहर. अहंकारींनी इथल्या झोपडपट्टीसारख्या गरीब वस्तीत मोठा यशस्वी उपक्रम राबवला आहे. ८० वस्त्यातील २ लाख स्त्रियांना बचतगटाच्या माध्यमातून आरोग्यसेवा पुरवल्या आहेत. बचतगटामार्फत स्त्रियांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन दिल्या जाते. गाई, म्हशी, दळण-कांडणाची लहान यंत्रे, दुकानांसाठी मदत वगैरे. ह्यासंबंधी अहंकारींचा अनुभव अगदी ह्रद्य आहे. एका बाईने बचत गटाकडून एक गाय घेतलेली असते. त्यासाठी तिने बचत-गटाला अवघे ६० रुपये भरलेले असतात. पण तिच्या नवर्‍याला तिने त्याची परवानगी न घेता हा कारभार केला हे आवडत नाही. तो तिला बेदम मारतो व घरातून काढून टाकतो. ह्यावर ती बाई, डोळे पुसते व गाय घेऊन जाऊ लागते. नवरा म्हणतो, गाय कशाला नेतेस ? त्यावर ती म्हणते बचत गटाने दिलीय, त्यांची त्यांना परत करते व जाते. ह्या अनुभवातून आत्मसन्मानासाठी स्त्रिया कशा तयार होत आहेत त्याचेही समाजाला भान यावे.
स्त्री-भ्रूण-हत्या विरोधात काम करीत असताना डॉ. अहंकारी एक विदारक प्रसंग सांगतात, ज्यामुळे कोणाही पुरुषाला लाज वाटावी. त्यांची एक कार्यकर्ती असते. ती सरपंच म्हणून निवडून येते. नवर्‍याचा प्रथम पाठिंबा असतो. पण नंतर तिच्या कामामुळे तिचे जागोजागी सत्कार व्हायला लागतात. ते सहन न होऊन मग तो तिला मारहाण करायला लागतो. बाईला एके वेळी भर सभेत तिच्या पाठीवरचे वळ दाखवावे लागतात. ह्या पुरुषी अहंकारामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना आजही प्रचंड त्रास होतो. कदाचित ह्या पुरुषी अहंकाराची सतत जाणीव रहावी म्हणूनच स्वत: अगदी निर-अहंकारी आणि कोणीही अभिमान बाळगावा असे ते असूनही डॉक्टरांनी अहंकारी हे आडनाव अजूनही जपले असावे.
असेच ग्रामीण भागात जी माणूसकी गरीबीमुळे जपली जाते त्यावर शहरी मध्यमवर्गीयांनी विचार करावा अशी घटना अहंकारींच्या कामात घडलेली आहे. ती अशी: एका बाईला तिच्या वस्तीत, कचर्‍यात एक नवजात मूल टाकून दिलेले सापडते. सगळ्या आजुबाजूच्या बायका, भारत-वैद्य, एकत्र येऊन ठरवतात की ह्या मुलीला सगळी वसतीच दत्तक घेईल व ह्या वसतीतच वाढवील. ज्याने टाकून दिलेय त्याच्या देखत. मग सगळ्याजणी मिळून पोलिसात जाऊन, रीतसर कारवाई करून, ती मुलगी वाढवितात, तिचा दरवर्षी वाढदिवस साजरा करतात. शहरातल्या संवेदनाशून्य झालेल्या वागण्यावर हे झणझणीत अंजनच जणू. ग्रामीण कळवळीचा पाठ शहरी जनतेने गिरवावा असेच हे कर्तृत्व आहे !
बाबा आमटे, गोविंदभाई श्रॉफ, अनंत भालेराव ह्यांच्या पाठबळाने डॉक्टर अहंकारी ह्यांचा समाजकार्याचा आवाका खूपच मोठा झालेला आहे. त्यांचे व्हिजन-वाक्यच मुळी आहे: निरोगी, स्वावलंबी व न्यायी समाज. आणि ह्यासाठी संस्थेचे व्रत ( मिशन ) त्यांनी ठेवले आहे: दुर्लक्षित घटकांचे संघटन, संस्था व शासन ह्यांच्यात समन्वय, व वैज्ञानिक दृष्टिकोनातून निरोगी व स्वावलंबी समाज निर्माण करणे. ह्या आवाक्यामुळे त्यांच्या उपक्रमात अंतर्भूत आहेत : सावली केंद्र ( स्त्रियांवरील हिंसाचार रोखण्यासाठी हस्तक्षेप ); किशोरी प्रशिक्षण ( शिवण क्लास, छंदवर्ग, वाचनालय, सायकल चालविणे, वगैरे ); कलापथक ( लोककलेतून आरोग्य संवाद साधण्यासाठी ह्यात बालविवाह, व्यसनमुक्ती, स्त्रीभ्रूणहत्या, विरोधी जनजागरण केले जाते ); ग्रामीण विज्ञान केंद्र ( ३० विद्यालयातील ८०० विद्यार्थी विज्ञान-प्रयोग शाळेचा लाभ घेतात. विज्ञान वाहिनी पुणे, व दुर्गादेवी ट्रस्ट पुणे त्यांना मदत करतात ); शाश्वत शेती ( सेंद्रीय शेतीचा प्रचार व प्रयोग ह्यासाठी १० गुंठे शेतीत महिलांना शेतीव्यवसायातल्या प्रयोगांची ओळख करून देण्यात येते);
डॉ. अहंकारींच्या अनेक प्रकल्पांना नामवंत संस्थांचे पाठबळ मिळते आहे. त्यात ऑक्सफॅम, फोर्ड फौंडेशन, युनिसेफ, स्विस-एड, सिद्धिविनायक ट्रस्ट, महाराष्ट्र फौंडेशन, व पाथ ह्या सेवाभावी संस्था त्यांच्या प्रकल्पांचा मरातब वाढवतात. "भारतवैद्यक डायरी आरोग्याच्या विकासाची" हे पुस्तक ग्रंथाली वाचक चळवळीने प्रकाशित केले आहे. तसेच युनिक फीचर्स तर्फे "खरेखुरे आयडॉल्स"मध्येही अहंकारी ह्यांचा अंतर्भाव आहे. "वेगळ्या वाटांचे प्रवासी" ह्या साकेत प्रकाशनातही त्यांची माहीती आहे. पाहता पाहता ह्या कार्याला आता १५ वर्षे होत आली आहेत. जिथे शहरातून अहंकारींचा सत्कार होतो वा सभा होतात त्याला ते त्यांच्या खेड्यातल्या १५/२० स्त्री -कार्यकर्त्यांना आवर्जून बरोबर घेऊन जातात, ज्यामुळे शहरातल्यांची व खेड्यातल्यांची जनजागृती होते. अहंकारींचा मुलगा सध्या इंग्लंडात एका संशोधनवृत्तीवर काम करतोय, त्यावरून हा वसा पुढच्या पिढीतही जपला जात आहे त्याची धन्यता वाटते. जगन्नाथाच्या रथाला जसे जितकी माणसे ओढतील तितके ते दैवत सहजी विराजते, तसेच मानून सर्व सेवाभावी लोकांनी ह्या संस्थेला अवश्य मदत करावी. त्यांचा पत्ता आहे : हॅलो मेडिकल फौंडेशन, जानकी रुग्णालय, अणदूर, ता.तुळजापूर, जि.उस्मानाबाद--पिन कोड: ४१३६०३ ( महाराष्ट्र ) व ई-मेल : shashikant.hmf@gmail.com आणि संकेत-स्थळ आहे: www.halomedicalfoundation.org

-------------------------------------------
अरुण अनंत भालेराव

-------------------------------------------------------

No comments:

Post a Comment